| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायतमध्ये विविध भागात 11 अंगणवाडी केंद्र आहेत. त्या अंगणवाडी केंद्रावरील छप्पर गळके राहून पोषण आहार घेण्यासाठी येणाऱ्या बालकांना बसण्यास अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी प्लास्टिक ताडपत्री देण्यात आले. या ताडपत्रीचे वाटप जिल्हा परिषद सदस्या आणि पंचायत समिती सदस्य यांचे हस्ते तसेच प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील काही अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे छप्पर जून झाले असल्याने या इमारती गळक्या बनल्या आहेत. परिणामी या अंगणवाडी केंद्रावर येणारे बालके यांची संख्या पावसाळ्यात घटते. ही बाब लक्षात घेऊन नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील अंगणवाडी सेविका यांच्याकडून ग्रामपंचायतकडे छप्पर झाकून ठेवण्यासाठी ताडपत्री यांची मागणी केली होती. त्यानुसार नेरळ ग्रामपंचायतीकडून ताडपत्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नेरळ ग्रामपंचायतमधील 11 अंगणवाडी केंद्र यांना ताडपत्री वाटप करण्यात आल्या. या ताडपत्रींचे वाटप जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता मोरे, कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे तसेच ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर, ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी केंद्राच्या सेविका आणि मदतनीस हजर होत्या. या ताडपत्री अंगणवाडी केंद्र हेतकर आळी, नवीन बाजारपेठ, पाडा, आनंदवाडी, कोंबलवाडी, पायरमाळ, टपाल वाडी, जुम्मापट्टी, धस वाडी, सम्राट नगर येथील सेविका आणि मदतनीस यांनी स्वीकारल्या.
नेरळ ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी केंद्रांना ताडपत्री वाटप
