। पनवेल । वार्ताहर ।
समाजाने नाकारलेल्या अनाथ, वंचित, उपेक्षित, निराधार आणि असाध्य आजाराने ग्रासलेल्या पालकांच्या गरजू बालकांचे पालकत्व स्वीकारून बाल हक्क कायद्यातील नियमांच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित अशा बालकांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करीत त्यांचा शैक्षणिक व सामाजिक दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने चालविल्या जाणार्या बालग्राम प्रकल्पातील बालकांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल यासह इतर शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य व छत्री वाटप करण्यात आले.
यावेळी ग्राम संवर्धनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, एकता सामाजिक संस्था कामोठेचे अध्यक्ष अमोल शितोळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे, श्रेयश ठोकळ, ग्राम संवर्धनचे राजेश रसाळ, सौ. मानसी पाटील, शैलेश कोंडस्कर, जयेश शिंदे, सचिन पाटील, अब्रार मुल्ला आदी बालग्राम मित्र उपस्थित होते. मागील दोन वर्षांपासून ’बालग्राम’ च्या बालकांना कोकण कट्टा विलेपार्ले ही संस्था धान्याची मदत करीत आहे तर चालू वर्षी एकता सामाजिक संस्था कामोठेने छत्र्या देवून मदत केली आहे त्याप्रमाणे समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही पुढे येवून बालग्राम प्रकल्पास सहकार्य करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केले आहे.