सोमवारपासून लसीकरण होणार जिल्ह्यातील 1 लाख 45 हजार 383 जणांना मात्रा
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात या वयोगटातील 1 लाख 45 हजार 383 लाभार्थी आहेत.
रायगड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 29 लाख 83 हजार 848 इतकी आहे. त्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील 1 लाख 45 हजार 383 इतके नागरिक आहेत. तर 69 हजार 769 लोकसंख्या 60 वर्षांवरील नागरिकांची आहे. आतापर्यंत 94.39 टक्के लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला असून, यापैकी 67.94 टक्के लाभार्थ्यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. मात्र सध्या जगात वाढत असलेले कोविड रुग्ण व आढळून येत असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्याचे निर्देश दिले असून, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यासोबत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांच्यासह 60 वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती, डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
त्यानुसार प्रशासनाने आरोग्य विभागाला सुचना दिल्या आहेत. 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड- 19 लसीकरण सुरु करावे व त्यांच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करावा. हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना 10 जानेवारी 2022 पासून प्रिकॉशन डोस देण्यात यावा. प्रिकॉशन डोस देताना संबंधित लाभार्थ्याने दुसरा डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असावे. 60 वर्षे वा वरील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंना त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांच्या सल्लयाने 10 जानेवारी 2022 पासून प्रिकॉशन डोस देण्यात यावा. प्रिकॉशन डोस देताना संबंधित लाभार्थ्यांने दुसरा डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असावे. 60 वर्ष वा वरील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंना प्रिकॉशन डोस देताना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किंवा दाखवण्याची आवश्यकता नाही. फक्त अशा व्यक्तिंनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा.
सर्व नागरीकांना शासकीय लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मोफत लस देण्यात येईल. ज्या नागरीकांना खाजगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल अशा नागरीकांसाठी केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेले किंमतीमध्ये लसीकरण करता येईल. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.