| तळा | वार्ताहर |
जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी तळा तालुक्याला भेट देऊन तालुक्यातील शेतकर्यांशी संवाद साधला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय तळा येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत स्थापन केलेल्या तळगड शेतकरी उत्पादक कंपनी व स्मार्ट प्रकल्पात असलेली तळा नवकृषक शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संचालकांची आढावा सभा घेऊन शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध योजनेच्या पीक प्रत्यक्षिकांना भेटी दिल्या.
दरम्यान, तळा येथे शेतकरी सुधीर नथुराम घाग यांनी आत्मांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमातून आंब्याच्या फळबागांमध्ये केलेली काळी मिरी लागवड, कुंभेट येथे सुरेश सखाराम कसबले यांचे शेतावर एन.एफ.एस.एम. योजनेंतर्गत नागली पिकाची ठोंबा पद्धतीने लागवड, महादेव नारायण काप यांच्या परसबागेतील भाजीपाला लागवड, पिटसई येथे धर्मा बाळाजी कातुर्डे यांची एम.आर.इ.जी.एस अंतर्गत केळी लागवड, रोवळा येथे श्रीराम शेतकरी बचत गटातील महिलांनी आत्मांतर्गत गटामार्फत केलेल्या नाचणी पीक लागवड, ताम्हणे येथे आत्मांतर्गत घेण्यात आलेल्या चारसूत्री पद्धतीने भात लागवड आदी पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. डॉ. पंजाबराव देशमुख योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध शेतकरी गटांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रकल्प उपसंचालक शिवाजी भांडवलकर, उपविभागीय कृषी अधिकारी रविशंकर कावळे, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा कृषी अधिकार्यांनी शेतकर्यांशी साधला संवाद
