उपविभागीय कृषी अधिकारी रविशंकर कावळे यांचे प्रतिपादन
। तळा । वार्ताहर ।
शेतकर्यांनी शेती शाळेमध्ये शिकवण्यात येणार्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी व तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करावा. जेणे करून शेतकरी शेती क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होऊ शकतो, असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी रविशंकर कावळे यांनी केले.
तळा तालुक्यातील ताम्हाणेतर्फे तळे येथे कृषी विभागामार्फत पाचव्या शेती शाळावर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गास उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव रविशंकर कावळे, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ रोहा डॉ.राजेश मांजरेकर यांनी भेट देऊन शेतकर्यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान आनंद कांबळे यांनी शेतकर्यांना विविध योजनांची माहिती दिली व शेतकर्यांनी आपल्या शेतात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत यासाठी कृषी विभाग सहकार्य करेल असे सांगितले.
कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.राजेश मांजरेकर यांनी भात पिकाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले व भात पीक घेत असताना शेतकर्यांना येणार्या समस्यांचे निराकरण केले. या नंतर कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे यांनी शेती शाळेमध्ये घेण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती देऊन शेती शाळेस शेतकर्यांना भात लावणीपासून ते काढणी व विक्री व्यवस्थापनपर्यंत सर्व बाबींचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगितले.







