| पनवेल | प्रतिनिधी ।
पनवेल परिसरात उभ्या असलेल्या ट्रेलरमधून डिझेल चोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून, त्यांचा तिसरा साथीदार वाहनासह फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पनवेलजवळील शिरढोण गावाच्या हद्दीत गोवा मार्गावरील साईकृपा हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रेलरमधून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे डिझेल चोरल्याची तक्रार ट्रेलर चालक रामप्रताप राजभर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, अविनाश गंथडे, महेंद्र वायकर, योगेश दिवेकर आणि विनोद देशमुख यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस हवालदार परेश म्हात्रे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्ह्यातील दोन आरोपी खारघर परिसरातील डोंगर भागात लपून बसल्याचे समोर आले.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुरज खरात (21) आणि भुपेंद्र सिंग (21) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे 1 लाख 11 हजार 600 रुपये किमतीचे 1200 लिटर डिझेल असलेले 30 कॅन जप्त केले. दरम्यान, या गुन्ह्यातील तिसरा आरोपी पप्पू कुमार हा चोरीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनासह फरार झाला असून, उर्वरित मुद्देमाल त्याच्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा शोध पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अविनाश गंथडे घेत आहेत.







