| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशन तर्फे जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी व्हॉलीबॉल स्पर्धा रविवार (१३) नोव्हेंबर रोजी को· ए.सो. माध्यमिक विद्यालय माणकुले येथे बहिरीचापाडा, माणकुले, नारंगीचा टेप व खारेपाट विभाग यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आली आहे.
या चाचणी स्पर्धेतून निवडण्यात येणारा रायगड जिल्ह्याचा संघ ३ व ४ डिसेंबर या कालावधीत पारनेर (अहमदनगर) येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करेल. माणकुले येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सुसज्य अशी तीन क्रीडांगणे तयार करण्यात आली असून जवळपास ५०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.
सहभागी होणाऱ्या खेळाडूंची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्पर्धा उत्तम होण्यासाठी विविध कमिटी नेमण्यात आल्या असल्याची माहिती रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनच्या अध्यक्षा, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील व जनरल सेक्रेटरी शरद कदम यांनी दिली.