जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

तिसर्‍या फेरीसाठी चुरशीची लढत

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात सुरू आहेत. या स्पर्धेत श्री गणेशकृपा, हिंद केसरी, शिवनेरी स्पोर्ट्स व आंबेवाडी यांनी पुरुष द्वितीय श्रेणी गटात तिसरी फेरी गाठली आहे. यावेळी, आठ संघांत तिसर्‍या फेरीसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली.

पुरुषांच्या पहिल्या सामन्यात श्री गणेशकृपाने पूर्वार्धातील 10-12 अशा पिछाडीवरून अमरदीप मंडळाचा प्रतिकार 23-21 असे मोडून काढले. श्रीकांत मोरे, आदेश जांगली यांच्या चढाई पकडीच्या संयमी खेळामुळे गणेशकृपाचा हा विजय शक्य झाला. अमरदीपच्या प्रसाद सिंह, कुणाल खारगावकर यांचा खेळ उत्तरार्धात थोडा कमी पडला. दुसर्‍या सामन्यात हिंद केसरी मंडळाने श्रीराम स्पोर्ट्सचा विरोध 33-29 असा संपविला. प्रणव वाडकर, रोहित तळेकर यांनी पहिल्या डावात आक्रमक खेळ करीत हिंद केसरीला 21-09 अशी आघाडी घेतली होती. मात्र, सुर सापडलेल्या श्रीरामच्या किरण खोत, भावेश गायकर यांनी आपला खेळ गतिमान करीत हिंद केसरीचा चांगलीच टक्कर दिली. परंतु, विजयापासून ते दूरच राहिले.

तिसर्‍या सामन्यात शिवनेरी स्पोर्ट्सने ऋषीमुनी स्पोर्ट्सला 28-19 असे नमवित आगेकूच केली. मध्यांतराला 16-10 अशी आघाडी शिवनेरीकडे होती. साहिल आवळे, दीपक मोरे शिवनेरीकडून, तर श्रेयस आंबोपकर ऋषीमुनी कडून उत्कृष्ट खेळले. चौथ्या सामन्यात आंबेवाडी मंडळाने श्री साई क्लबचा 33-26 असा पराभव केला. विश्रांतीला 16-10 अशी आघाडी आंबेवाडीकडे होती. विश्रांती नंतर मात्र सामन्यात रंगतदार क्षण पहावयास मिळाले. ऋषिकेश शिंदे, यश माचिवले आंबेवडीच्या विजयात चमकले. तेजस गायकवाड, वेदांत वारीसे यांनी श्री साई क्लबकडून दुसर्‍या डावात कडवी लढत दिली.

इतर निकालात महालक्ष्मी विरूद्ध गावदेवी (34-11), वीर नेताजी विरूद्ध युवा स्पोर्ट्स (43-20), जय खापरेश्‍वर विरूद्ध श्रीमंतयोग (34-23).

Exit mobile version