मुरुड तालुक्यातील घटना; प्रशासनाकडून कुटुंबांचे प्रबोधन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्णयामुळे मुरुड तालुक्यातील मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासीवाडी येथे होणारा बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले.
बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना बळी पडू नका. जिल्ह्यातील कातकरी आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना सर्व प्रकारचे शासकीय लाभ, दाखले मिळवून देण्यासाठी, आरोग्य सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी, त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. – डॉ.महेंद्र कल्याणकर,जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना सोमवारी (21 फेब्रुवारी) सकाळी 8 वाजताच मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासीवाडी येथे बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासीवाडी येथे जाण्याबाबत व संबंधितांचे प्रबोधन करून हा बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले.
त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी अलिबाग प्रशांत ढगे व मुरुड तहसिलदार रोहन शिंदे यांनी तात्काळ मुरुड तालुक्यातील निवासी नायब तहसिलदार रविंद्र सानप, भोईघर तलाठी अमृत चोगले यांना घटनास्थळी तात्काळ पाठविले. भोईघर गावचे सरपंच काशिनाथ वाघमारे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी चौकशी केली असता टेंभोंडे आदिवासीवाडी येथे दुपारी 2 च्या सुमारास राणी वाघमारे, वय 15 रा. टेंभोंडे व .शांताराम लक्ष्मण जाधव, वय 17, रा.साळाव आदिवासीवाडी संजयनगर यांचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक प्रशासनातील निवासी नायब तहसिलदार विंद्र सानप, भोईघर तलाठी अमृत चोगले, भोईघरचे सरपंच काशिनाथ वाघमारे या सर्वांनी मुलीची आई श्रीमती यमुना लक्ष्मण वाघमारे व त्यांच्या कुटुंबियांचे हा बालविवाह न करण्याबाबत योग्य प्रबोधन व मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे वर मुलगा मौजे साळाव येथील असल्याने रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात, मंडळ अधिकारी श्री.लक्ष्मण शेळके, साळाव तलाठी भावना धोदडे, निडी पोलीस पाटील श्री.नितेश पाटील, साळाव पोलीस पाटील .मेहबूब हुसैन गोरमे व साळाव ग्रामपंचायत सदस्य राजू वाघमारे, साळाव सरपंच निलम पाटील, ग्रामस्थ श्री.नरेश वाघमारे या सर्वांनी मौजे साळाव येथेच मुलाचे वडील लक्ष्मण जाधव व त्यांच्या कुटुंबियांचे प्रबोधन व मार्गदर्शन करुन बालविवाह रोखला. यावेळी या दोन्ही कुटुंबांकडून हा बालविवाह करणार नसल्याची लेखी हमीही घेण्यात आली.