| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माथेरान शहराला भेट दिली. निवडणुकीची तयारी तसेच निवडणूक यंत्रणेला सूचना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची ही भेट होती. तर, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडून तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांचा आढावा घेण्यात आला. त्यांनी, माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेसाठी केवळ 4,055 मतदार असल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडून मतदारांना आवाहन करण्यात आले. तसेच, जास्त मतदान व्हावे यासाठी स्थानिक नगरपरिषद शाळा आणि खासगी शाळांनी जनजागृती मोहीम राबवावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूर आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी केली. त्याचबरोबर माथेरान शहरात वाहनांना बंदी आहे. त्यामुळे वृद्ध आणि अपंग मतदार यांच्यासाठी पर्यावरण पूरक ई-रिक्षा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली. त्याचवेळी शहरात आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी लावण्यात आलेल्या चार पथकांची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतली.







