‘समान काम, समान वेतन’साठी बेमुदत संप; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचेही अन्नत्याग साखळी उपोषण
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
‘समान काम, समान वेतन’ या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अलिबाग जिल्हा न्यायालयासमोर मंगळवारी (दि. 17) शेकडो कर्मचारी ठिय्या देऊन बसले असून, बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजाला फटका बसला असून, अनेक कामे ठप्प झाली आहेत. दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग साखळी उपोषण सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या निर्देशानुसार सफाई कामगारांपासून प्रबंधकांपर्यंत सर्व स्तरांतील साडेपाचशेहून अधिक कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. कामाच्या स्वरूपानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, वेतनातील तफावत दूर करावी आणि ‘समान काम, समान वेतन’ हे तत्त्व लागू करावे, या प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी लावून धरल्या आहेत. अलिबाग जिल्हा न्यायालयासमोर रस्त्याच्या बाजूला कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, कामकाज बंद ठेवत बेमुदत संपाची भूमिका घेतली आहे.
या संपामुळे न्यायालयातील नियमित कामकाज विस्कळीत झाले असून, पक्षकार आणि वकिलांची गैरसोय होत आहे. न्यायालयीन कामकाजावर मोठा परिणाम होऊ नये, यासाठी न्यायालय प्रशासनाने विधी स्वयंसेवकांची मदत घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून सकाळपासून कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सेवानिवृत्तांचे अन्नत्याग साखळी उपोषण
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीही एल्गार पुकारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तावित केलेल्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला शासनदरबारी दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत मंगळवारी (दि. 17) सकाळपासून अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग साखळी उपोषण सुरू करण्यात आले. वेतनवाढीचा प्रस्ताव गेल्या 20 महिन्यांपासून प्रलंबित असून, शासनाकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या उपोषणात सुरेश महाडीक, अनंत लोहार, प्रणिता पाटील, तनुजा पाटील, गीता पवार, रामभाऊ कांबळे यांच्यासह शंभरहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग करून आंदोलन सुरू केले आहे.







