जिल्हा परीक्षा केंद्रामुळे विद्यार्थ्यांचे होणार कल्याण

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका ही नूतन वास्तू दिमाखात उभी राहिली आहे. या नवीन वास्तूचे उद्घाटन सोमवारी (दि.3) सकाळी 11 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सध्याचे विभागीय कोकण आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्यांमधून जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांकरिता गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन, ऑनलाईन मार्गदर्शन तसेच स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली होती. याचेच पुढचे पाऊल म्हणून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी अभ्यास केंद्र मिळावे, या हेतूने तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र व अभ्यासिका उभे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अलिबागमध्ये उभारण्यात आलेल्या या जिल्हा स्पर्धा केंद्र आणि अभ्यासिका वास्तुने स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांचे कल्याण होणार हे नक्की.

Exit mobile version