जिल्हा रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया कक्ष बंद

रुग्णांची गैरसोय; खासगी उपचारापोटी आर्थिक भुर्दंड

| अलिबाग | प्रतिनिधी |

डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया व्हावी म्हणून जिल्हाभरातून रुग्ण अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात येतात, महिनाभरापासून शस्त्रक्रिया कक्ष बंद आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. शिवाय ज्या रुग्णांचे ऑपरेशन झाले आहे, त्यांना पुनर्तपासणीत अडचणी येत आहेत. पावसाळ्यात डोळ्यांचे आजार बळावतात. त्यामुळे शस्त्रक्रिया कक्ष लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे. तर पुढील दोन दिवस हा कक्ष बंद राहणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नेत्र शस्त्रक्रिया विभागासाठी वेगळी इमारत आहे.

मात्र, या इमारतीच्या छताचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पावसाळ्यात गळती लागते. भिंतींना लागलेली बुरशी, छतातून गळणारे पाणी यावर उपाय म्हणून गतवर्षी इमारतीच्या छताची दुरुस्ती करून ऑपरेशन थिएटरचे काम करण्यात आले होते. आरसीसी छतावर लोखंडी पत्र्याची शेड टाकण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यावर शस्त्रक्रिया विभाग पूर्ण क्षमतेने काम करेल, असा विश्वास रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त केला गेला होता. परंतु दोन महिन्यापूर्वी ऑपरेशन थिएटरमधील वातानुकूलित यंत्रणा निकामी झाली होती. त्यामुळे शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. सध्या नेत्र शस्त्रक्रिया विभागात एकही रुग्ण दाखल नाही. सर्वसामान्य रुग्णांना उपचार करता यावेत, म्हणून शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला. यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, मात्र देखभाल-दुरुस्तीअभावी नेत्र शस्त्रक्रिया विभाग सातत्याने बंद पडत असून सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो.

ऑपरेशन थिएटरमधील वातानुकूलित यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिक बोलावला होता, मात्र दुरुस्तीनंतरही तांत्रिक बिघाड झाल्याने हा विभाग बंद आहे. पावसाळ्यात संसर्गाचा धोका निर्माण होत असतो. सध्या नेत्र विभाग बंद असला तरी लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

अंबादास देवमाने, जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड
Exit mobile version