नॉर्मल प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालय आधार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाकाळात जिल्हा सामान्य रुग्णालय गर्भवती महिलांसाठी आधार बनले आहे. रुग्णालयात प्रसूती विभागात तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिका कार्यरत आहेत. या ठिकाणी सिझेरियनपेक्षा नॉर्मल प्रसूतीवर अधिक भर दिला जातो, असा विश्‍वास महिलांमध्ये असल्याने दररोज अनेक महिला प्रसूतीसाठी येतात. मागील 18 महिन्यांच्या कालावधीत 15 हजार सीझर, तर 40 हजार नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा कहर आहे. सारेजण उपचारासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होतात. अशावेळी याच रुग्णालयात आपली प्रसूती करून घेणे काही महिलांना डोईजड होत आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षिततेसाठी काही महिला खासगी रुग्णालयात आपली प्रसूती करून घेत आहेत.
म्हणून शासकीय नको वाटते!
रुग्णालयात असलेली अस्वच्छता, तेथून येणारी दुर्गंधी ही नको करणारी असते. त्यामुळे होणारा त्रास हा नको वाटतो. म्हणूनच खासगी रुग्णालयात दोन पैसे जास्त गेले तरी चालतात.
नीता चोरघे
जिल्हा रुग्णालयात उपचार चांगले मिळत असले तरी तेथील येणारा दुर्गंध तसेच असुविधेमुळे नको वाटते.
कुंजाली बनकर
जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात पाच हजारांहून अधिक प्रसूती करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रसूतीसाठी महिला येतात. येथे प्रसूतीपूर्व करण्यात येत असलेल्या अनेक अवघड शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. तसेच नॉर्मल प्रसूती करण्यावरच अधिक भर असतो. पर्यायच नसेल तर सिझेरियन केले जाते. या ठिकाणी असलेल्या खाटांच्या क्षमतेपेक्षाही अधिक रुग्ण दाखल होत असल्याने अडचण होते.
डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक



Exit mobile version