जिल्हास्तरीय नृत्यकला स्पर्धेत साई प्रेरणा कलामंच प्रथम

| मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
युवासेना आयोजित जिल्हास्तरीय नृत्यकला स्पर्धा 2022 मधिल सोलो डान्स स्पर्धेत उरणच्या निलेश म्हात्रे तर ग्रुप डान्स स्पर्धेत साई प्रेरणा कलामंच पेझारी यांनी प्रथम क्रमांक पटकावले. त्यांना अनुक्रमे पाच व दहा हजार रोख रक्कम तसेच स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुरुड तालुक्यातील खार मजगाव येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 25 जण सोलो डान्स तर 17 ग्रुप डान्समध्ये सहभागी झाले होते.स्पर्धेचे उदघाटन राजश्री मिसाळ यांच्या हस्ते झाले. सोलो डान्स स्पर्धेत पेझारीच्या दिक्षा भोपीला व्दितीय तर पेझारीच्याच सिया म्हात्रेला तृतिय क्रमांक मिळाला त्यांना अनुक्रमे तिन व दोन हजार रोख रकमेसह स्मृतीचिन्ह बक्षिस देण्यात आले.तर ग्रुप डान्स स्पर्धेत मुरुडच्या सेव्हन स्टारला दुसर्‍या क्रमांकाचे रोख सात हजार व सन्मानचिन्ह तर मजगावच्या श्री मावळा मर्दानी आखाडा ग्रुपला तिसर्‍या क्रमांकाचे रोख चार हजार व सन्मानचिन्ह रुपेश रोटकर यांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धेत परीक्षक म्हणून राजू पाके, निलेश गुंड, निखिल हरणेकर, निर्जला व प्रतिक यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहन पाटील-रोहा व आशिष बुल्लु यांनी केले.

Exit mobile version