धैर्य सामाजिक संस्थेचा जिल्हास्तरीय सन्मान

। पोलादपूर । वार्ताहर ।
रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जनजातीगौरव सप्ताह विशेष भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्ह्यात आदिवासी समाज बांधवांच्या कल्याणासाठी कार्यतत्पर असलेल्या स्वयंसेवी संस्थांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने, पोलादपूर तालुक्यात विशेष कार्य करणार्‍या धैर्य सामाजिक संस्थेला गौरविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड तसेच उपस्थित मान्यवर अधिकारी यांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडला.
पोलादपूर तालुक्यात आदिवासी समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या धैर्य सामाजिक संस्थेला या जिल्हास्तरीय सत्काराचा बहुमान मिळाला. सत्कार स्वीकारण्यासाठी धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर आणि सचिव महेश सावंत उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थी आणि माताभगिनींसाठी विद्यार्थी दत्तक उपक्रम, विद्यार्थी कौशल्य उपक्रम, सॅनिटरी पॅड वाटप आणि जनजागृती असे कित्येक सामाजिक उपक्रम आजपर्यंत धैर्य सामाजिक संस्थेने राबविले आहेत. या सामाजिक कार्याची दखल घेत पोलादपूरचे निवासी नायब तहसीलदार शरदकुमार आडमुठे यांनी तालुक्यातून धैर्य सामाजिक संस्थेची निवड केली होती.

Exit mobile version