। नेरळ । प्रतिनिधी ।
रेल्वे कामगार नेते कै.हरीचंद्र टोकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ टोकरे फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. उरण येथील जय गणेश कबड्डी संघाने अंतिम फेरीत मिडलाईन कर्जत संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. जिल्ह्यातील नामांकित 32 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात टोकरे फाऊंडेशन आणि भाई कोतवाल कबड्डी संघ यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन माजी आ.सुरेश लाड आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांचे हस्ते झाले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, तालुका अध्यक्ष भगवान चंचे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, शरद लाड, तेहसीन सयेद आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचवेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, शेकापचे श्रीराम राणे, नितीन कांदळगावकर, तालुका सरचिटणीस राजेश भगत, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी कार्यक्रमात कर्जत तालुक्यात वेगवेगळ्या क्षेत्रात नाव लौकिक मिळविणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यात थेट आयएएस प्रतीक जुईकर, शूरवीर मयूर शेळके, पॉवर लिफ्टर अमृता भगत, चित्रकार श्रेया चंचे, सायकल पटू गजानन डुकरे, जाहिरात क्षेत्रातील भास्कर तरे, रोहन कराळे, नीता राठोड, रोशन वाडेकर यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह आस्वाद पाटील, जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी जे.जे.पाटील, सूर्यकांत ठाकूर, कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनचे मधुकर घारे, प्रभाकर बडेकर, किसन खडे, बाका मरे आदींनी भेट दिली.
स्पर्धेत उरणचा गणेश संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर कर्जतचा मिडलाईन संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत रोहा धाटाव सोनार सिद्ध संघाला तिसर्या तर पेण कोळवे येथील ज्ञानेश्वर संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान भारत पाटीलने तर उत्कृष्ट पकडसाठी सुयोग गायकर आणि उत्कृष्ट पकडसाठी अजय मोरे यांना सन्मानित करण्यात आले.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ; उरणचा गणेश कबड्डी संघ विजयी
