। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनच्या पहिल्या तालुका स्तरीय कबड्डी लीग मध्ये भैरवनाथ वारियर्स संघाने टायगर वॅरियर्स संघाचा पराभव करून पहिली कबड्डी प्रीमियर लीग जिंकली.12 व्यवसायिक संघांचा सहभाग असलेली कर्जत कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा कर्जत कृषी उतपन्न बाजार समितीच्या मैदानावर झाली.
आ. महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पुढाकाराने पहिली कबड्डी प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील एकाहून एक सरस कबड्डी खेळाडूंचा सहभाग असलेल्या पहिल्या कबड्डी लीगचे उदघाटन सोहळयाला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू राजू भावसार, सुधीर पाटील, अशोक शिंदे, सूर्यकांत पाटील यांच्यसह प्रो कबड्डीमधील खेळाडू आमीर धुमाळ, मयूर कडव, केदार लाल, अनिल पाटील यांनी उपस्थिती लावली. स्पर्धेचे आयोजन कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनने जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह जे. जे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यावेळी कर्जत कबड्डी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष संतोष भोईर, मधुकर घारे, मनोहर थोरवे, काशिनाथ शिंदे, जगदीश ठाकरे, प्रदीप ठाकरे,भगवान कराळे, विवेक बडेकर, राजू वाघरे, योगेश देशमुख, समीर येरुणकर, मनोज क्षीरसागर यांनी नियोजनात सहभाग घेतला होता.
भैरवनाथ वॉरिअर्स संघाने टायगर वॅरियर्स या संघाचा पराभव करून पहिल्या कबड्डी प्रीमियर लीगचे अंतिम विजेतेपद पटकावले. तर शरद लाड फाउंडेशन हा संघ तिसर्या आणि वैभव कॉन्स्ट्रक्शन हा संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. स्पर्धेत प्रशांत जाधव हा खेळाडू सर्वोत्तम खेळाडू ठरला. तर उत्कृष्ट चढाईसाठी प्रतिक बैलमारे,़ उत्कृष्ट पक्कड तुषार वाडेकर, सर्वोत्तम सपोर्ट डिफेंडर वैभव मोरे, पब्लिक हिरो रुपेश म्हसकर याला सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट खेळाडूंसाठी सायकल आणि सर्वोत्तम खेळाडूसाठी बाईक भेट देण्यात आली.