यश क्रीडा, रण झुंजार उपांत्य फेरीत
| मुंबई | वृत्तसंस्था |
चारचौघे मित्र मंडळ या मुंबई शहरच्या सामनाधिकार्यांच्या संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश क्रीडा, श्री साईनाथ मंडळ यांनी द्वितीय, तर श्री गणेश व्यायाम शाळा, रण झुंजार मंडळ यांनी तृतीय श्रेणीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या द्वितीय श्रेणीच्या उपांत्यपूर्व सामन्यात यश क्रीडा मंडळाने पुर्वाधातील 08-13 अशा पिछाडीवरुन श्री साई क्लबचा कडवा प्रतिकार 32-16 असा सहज मोडून काढला. संदेश पाटीलने पूर्वार्धात उत्कृष्ट खेळ करीत श्री साईला आघाडी मिळवुन दिली होती. पण ती त्यांना राखता आली नाही.
उत्तरार्धात यशच्या ओमकार मानेकर, रोशन खोत यांनी जोरदार प्रतिहल्ला करीत संघाला सहज विजय मिळवून दिला. श्री साईनाथने प्रतिज्ञा मंडळाला 25-18 असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. विश्रांतीला 15-08 अशी साईनाथ संघाकडे आघाडी होती. शेवटी तीच त्यांच्या कामी आली. महेश जाधव, धनराज भोईर श्री साईनाथ कडून, तर अक्षय कांबळे, निखिल पटेल प्रतिज्ञा कडून उत्कृष्ट खेळले. याच गटातील अन्य उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आकांक्षाने आंबेवाडीला 44-16, तर महालक्ष्मीने गणेश क्लबला 36-26 असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली.
तृतीय श्रेणी गटाच्या उपांत्य पूर्व सामन्यात श्री गणेश व्यायाम शाळेने ज्ञानेश्वर मित्र मंडळाला 35-33 असे चकवित आपली घोडदौड सुरू ठेवली. अत्यंत चुरशीने खेलेल्या या सामन्यात मध्यांतराला 20-16अशी गणेशकडे आघाडी होती. रोहित मोरे, आदित्य गुप्ता यांच्या चढाई पकडीच्या खेळाने या विजयाची किमया साधली. आकाश मोरे, प्रणय कनेरकर यांनी ज्ञानेश्वर संघाला विजय मिळवुन देण्याकरिता शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. रण झुंझार मंडळाने गुरू माऊली स्पोर्टस् वर 37-25 असा विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. पहिल्या डावात 17-15 अशी आघाडी घेणार्या रण झुंजारने दुसर्या सत्रात जोरदार मुसंडी मारत 12गुणांच्या फरकाने विजय साकारला. विनायक कांबळे, ओमकार पोमेडकर रण झुंजार कडून, तर दिनेश धापने, प्रणित बडद यांनी गुरू माऊली कडून उत्तम खेळ केला. या गटातील अन्य सामन्यात प्रगती मंडळाने रामसेवक मंडळाचा 35-19, तर बाळ गोपाळ मित्र मंडळाने यंग उमरखाडीचा 40-24 असा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली.