| रायगड | वार्ताहर |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. 15) रेड रिबीन क्लबच्या संदर्भात आरआरसी नोडल अधिकारी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील रेड रिबीन क्लबचे नोडल अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील विविध पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली होती.
जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे संजय माने यांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. टी.पी. मोकल, विभागीय समन्वयक प्रा.डॉ. प्रवीण गायकवाड आणि प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रवींद्र पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामधून रेड रिबीन क्लबसंदर्भात माहिती सांगितली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी सदरील कार्यशाळेचे अध्यक्षीय भाषण केले.
या कार्यशाळेला जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील रवींद्र कदम, संपदा मलेकर, रुपेश पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. निशिकांत कोळसे, क्रीडा अधिकारी प्रा. तेजेश म्हात्रे, प्रा. श्वेतल झिंजे, प्रा. कपिल जोशी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी तसेच रेड रिबन क्लबचे नोडल अधिकारी प्रा. दिनेश पाटील यांनी केले.