लाडांच्या नाराजीमुळे कार्यकारीणीची बैठकच रद्द; प्रदेशाध्यक्षांसमोर नामुष्की
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा अभियानाच्या निमित्ताने अलिबाग येथे रायगड जिल्हा कार्यकारीणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र नाराज असलेल्या जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी या संपूर्ण दौर्यात आपली नाराजी व्यक्त करीत राजीनामा देत पाठ फिरवली. त्यामुळे खुद्द प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थिती आयोजित केलेली जिल्हा कार्यकारीणीची बैठकच रद्द करण्याची नामुष्की ओढवली. जिल्हाध्यक्षांनी सुरु केलेल्या या वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असल्याचे स्पष्ट झाले.
या बैठकीऐवजी मग विधानसभा मतदारंसघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकार्यांच्या संघटनाचा आढावा घेतला. यावेळी पदाधिकार्यांनी त्यांची चांगलीच शाळा घेत कानपिचक्याही दिल्या. तयारीत कमी पडल्याने उत्तरे देताना पदाधिकार्यांची उडत असलेली भंबेरी पाहून शेवटी खासदार सुनील तटकरे यांना त्यांची बाजू सावरुन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील,जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रायगडचे खा. सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती सक्षना सलगल, महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रुपाली दाभाडे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, उपाध्यक्ष स्मिता खेडेकर, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे, मुरुड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, मुरुड युवक अध्यक्ष मनिष माळी, अलिबाग युवक अध्यक्ष मनोज शिर्के, सरचिटणीस मानसी चेऊलकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन बळकट करण्यासाठी राज्यभर राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारपासून हा दौरा सुरु करण्यात आला. मात्र या दौर्यातच मोठा धक्का बसला तो जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांच्या राजीनाम्याने. दुसर्यांदा राजीनामा देणार्या सुरेश लाड यांनी यावेळी कर्जतमध्ये सुरु झालेल्या दौर्यातच आपल्या स्वीय सहायकामार्फत आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला. पनवेल-उरण हजर असलेल्या सुरेश लाड यांच्यासोबत संघटनात्मक उघड आरोप झाल्याने त्यांनी आपला राजीनामा दिल्याचे समजते.
या दौर्याच्या दुसर्या दिवशी अलिबाग येथील मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. येथे जिल्ह्याच्या संपूर्ण संघटनाविषयी चर्चा केली जाणार होती. मात्र प्रत्यक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माईक हातात घेत जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांचे नाव उच्चारतच आढावा घेण्यास प्रारंभ केला. तोच व्यासपीठावरुन सुरेश लाड उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर कार्यकारीणीची बैठक असल्याची आठवण जयंत पाटील यांनी करुन देताच सावरासावर करीत आता ही अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक सेलच्या अध्यक्षांची शाळा घेत चांगलीच फिरकी घेतली. अनेक पदाधिकार्यांना तर आपली कार्यकारीणी देखील सांगता आली नाही. काही सेलच अस्तित्वात नसल्याचेही समोर आले. त्यामुळे जयंत पाटील यांच्या चेहर्यावरची नाराजी लपून राहिली नाही. शेवटी खा. सुनील तटकरे यांनाच त्यात हस्तक्षेप घेत सारवासारव करावी लागली. या संदर्भात सुरेश लाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.