2 हजार शाळांमध्ये संगणक, लॅपटॉप, मोबाईलची सोय
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता अधिक उत्तम व्हावी, यासाठी रायगड जिल्हा परिषद जिल्ह्यातील 2 हजार 603 शाळांपैकी सुमारे 2 हजार 12 पेक्षा अधिक शाळांमध्ये संगणक, लॅपटॉप, मोबाईल आदी आधुनिक साधन-सामुग्रीच्या माध्यमातून शिक्षणावर भर देणार आहे.
जिल्ह्यात एक हजार 864 गावे आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत चांगल्या तसेच दर्जेदार शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. सेस फंडासह जिल्हा नियोजन समिती, गावातील शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी, शिक्षकांनी पुढाकार घेऊन शाळा, वर्ग डिजिटल करण्यासाठी पावले उचलली आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक पध्दतीचे शिक्षण घेता यावे, यासाठी संगणक, मोबाईल, लॅपटॉपमार्फत वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या आधारे शैक्षणिक धडे गिरवण्यात येत आहेत. त्यामुळे हसत खेळत शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागत असल्याचे दिसून येत आहे.
प्राथमिक शाळा डिजिटल करण्यासाठी विविध क्षेत्रातून मदतीचे हात पुढे येत आहेत. रायगड जिल्हा परिषद शाळांपैकी 80 टक्के शाळा डिजिटल साक्षर झाल्या असून त्या शंभर टक्के डिजीटल होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
आकलन शक्ती वाढणार
जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या 2 हजार 603 शाळा आहेत. त्यापैकी दोन हजार 12 पेक्षा अधिक शाळांमध्ये संगणक, लॅपटॉप, मोबाईलद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुगल, यूट्युबच्या माध्यमातून माहितीचे संककलन करुन विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी संगणक, मोबाईल, लॅपटॉपद्वारे अशा विविध गॅझेटचा वापर करण्यात येत आहे.
पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड