। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा क्रिकेट अससिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला खारघर येथील बी.पी पाटील व घरत मैदानांवर प्रारंभ करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण 24 अकॅडमी व क्लबच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
जिल्ह्यातील 24 संघांना विविध गटात समाविष्ट करण्यात आले असून स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद फेरीनुसार खेळवण्यात येणार आहेत. ही क्रिकेट स्पर्धा 40 षटकांची एकदिवसीय निवड चाचणी स्पर्धा आहे. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर संघाची निवड करण्यात येणार आहे. पुढे निवडलेला रायगड जिल्हाचा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित अंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यात स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमी कळंबोली संघाने क्रिकेट अकॅडमी ऑफ पठाण संघावर 5 गडी राखून विजय मिळवला आहे. यामध्ये स्पोर्टी-गो संघाचा वरद वासकर यांनी 4 गडी बाद केले. तर, अज्रिब शेख यांनी 54 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. दुसरा सामना प्रो किंग्ज क्रिकेट अकॅडमी विरूद्ध मोरया क्रिकेट अकॅडमी यांच्यात झाला. यामध्ये प्रो किंग्ज संघाने 5 गडी राखून सामना जिंकला आहे. आयुष माळी यांनी स्पर्धेतील पाहिले शतक झळकावले असून अवघ्या 68 चेंडूनमध्ये 101 धावा काढला आहेत. तर, कर्णधार राहुल प्रजापती यांनी 5 फलंदाज बाद करून संघाला विजय मिळवून दिला.
यावेळी रायगड जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.