नगरपंचायतीसाठी जिल्ह्यात बहुरंगी लढत

6 नगरपंचायतींमध्ये 53 जणांची माघार 237 उमेदवार रिंगणात
। अलिबाग । भारत रांजणकर ।
रायगड जिल्ह्यात होणार्‍या नगरपंचायतींच्या निवडणूकांना आता चांगलेच रंग भरु लागल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर 6 नगरपंचायतीमधील राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहेे. खालापूर, पोलादपूर, तळा, म्हसळा, माणगाव आणि पाली या सहा नगरपंचायतीमध्ये ओबीसाी जागा वगळून 80 जागांसाठी 290 दाखल निवडणूक नामनिर्देशन अर्जांपैकी 53 जणांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात 237 उमेदवार उरले आहेत. प्रत्येक नगरपंचायतीमध्ये राजकीय युत्या आणि आघाड्यांना जोर चढला असून बहुरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील पाली, तळा, म्हसळा, पोलादपूर, माणगाव आणि खालापूर या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाच्या स्थगित निर्णयामुळे सहा नगरपंचायतींमधील प्रत्येकी 80 जागांसाठी निवडणूक होत आहे. छाननीनंतर पालीमध्ये 48, तळा 39, म्हसळा 39, पोलादपूर 43, माणगाव 48 आणि खालापूर येथे 73 असे एकूण 290 उमेदवारी अर्ज उरले होते. त्यापैकी आज उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीत पालीमध्ये 2, तळा 3, म्हसळा 1, पोलादपूर 4, माणगाव 18 आणि खालापूर येथे 25 अशा एकूण 53 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानुसार आता या सहा नगरपंचायतींमध्ये 237 उमेदवार रिंगणात उरले असून त्यांच्यात लढत होणार आहे. यामध्ये पालीमध्ये 46, तळा 36, म्हसळा 38, पोलादपूर 39, माणगाव 30 आणि खालापूर मध्ये 48 यांच्यात लढत होणार आहे.
या नगरपंचयत निवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.

Exit mobile version