रक्षाबंधन सणानिमित्त जिल्हाभरात उपक्रम


बहीण-भावाचं नातं दृढ करणारी राखी पौर्णिमा बुधवारी घरोघरी उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयातही विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन विविध उपक्रमांतून साजरा केला. यावेळी वृक्षांना राखी बांधून निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. तर, समाजाच्या रक्षणासाठी सदैव कार्यतत्पर असणाऱ्या पोलिसांना विविध सामाजिक संस्था-संघटनाकडून औक्षण करीत राखी बांधण्यात आली. दरम्यान, या सणानिमित्त आनंद आणि उत्साहाचे वातावरण सर्व ठिकाणी पाहावयास मिळाले.

गोमाशी शाळेत रक्षाबंधन साजरा

| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद शाळा गोमाशी येथे नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या हातावर राख्या बांधून गोड खाऊ भरून आनंद साजरा करण्यात आला.


यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खैरे यांनी भारतीय सण आणि संस्कृती जोपासत आपले सण साजरे केले जातात, तसेच विद्यार्थ्यांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणाचे महत्त्व सांगितले.

विद्यार्थ्यांनी झाडांना बांधल्या राख्या

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील विद्या विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत रक्षाबंधन सण साजरा करताना झाडांना राख्या बांधल्या. विद्यार्थ्यांनी त्यासाठी पारंपरिक वेशभूषा केली होती. कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर कर्जत या शाळेत नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी संस्कृतीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थी आले होते.


नारळी पौर्णिमेनिमित्त कोळीगीते साजरी करून विद्यार्थ्यांनी उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी केली. तर रक्षाबंधन सण साजरा करताना विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील झाडांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने ‌‘वृक्षबंधन’ साजरे केले. त्यासाठी दरवर्षी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन आणि रक्षण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे हा संदेश त्यातून सर्वांना दिला. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राखी बांधून सामाजिक बांधिलकीचा ही संदेश दिला.कार्यक्रमात महिला मंडळ संस्थेच्या कार्याध्यक्षा मीना प्रभावळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा गाढे, पर्यवेक्षिका श्रद्धा मुंढेकर यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाला होते.

कामोठेमध्ये शेकापची सामाजिक बांधिलकी

| पनवेल | वार्ताहर |
कामोठे विभागातील शेतकरी कामगार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शहराला ऊन, पाऊस, सण या कशाचीही तमा न बाळगता अहोरात्र वीजपुरवठा मिळावा म्हणून काम करणारे वायरमन तसेच शहर स्वच्छ करणारे सफाई कामगार यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. महत्त्वाचे पण सतत टीकेचे धनी असलेले हे बांधव सणाच्या दिवशीसुद्धा कार्यरत असतात.


यावेळी शेकाप महिला अध्यक्षा उषा झणझणे, कार्याध्यक्षा शुभांगी खरात, अनिता महागडे, अलका चौधरी, सुप्रिया माने, ताई भोसले, तसेच मा. नगरसेवक प्रमोद भगत, प्रमोद म्हात्रे, अल्पेश माने, गौरव पोरवाल आदी उपस्थित होते. आजपर्यंत फक्त लाईट गेली आणि बिल जास्त आले की लोक कार्यालयात येतात आणि त्यातली काहीजण अक्षरशः भांडणेसुद्धा करतात. आम्ही पण चतुर्थ श्रेणीतील कामगार आहोत, आम्हाला शक्य असेल तेवढे आम्ही करतो, पण आमचे दुःख कोणच जाणून घेत नाही. पण आज शेकापच्या घरापासून दूर असलेल्या बहिणीची कमतरता जाणवली नाही, अशी भावना कामगारांनी व्यक्त केली.

वडगाव शाळेतील विद्यार्थ्यांचे राखी प्रदर्शन

| पाताळगंगा | वार्ताहर |
शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान असणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे विद्यार्थ्यांना राख्या निर्मितीचे शिक्षण देण्यात आल्याने त्यांनी सहजपणे राख्या बनविल्या. यासाठी शाळेमध्ये समर्थ राखी सेंटर, नक्षत्र राखी, गावदेवी राखी भांडार, एकलव्य राखी केंद्र अशी मुलांच्या स्टॉलला नावे देण्यात आली होती. स्वतः विद्यार्थ्यांनी केलेली राखी परिसरातील महिलांनी आपल्या भाऊरायासाठी खरेदी केली. शाळा ही विद्यार्थ्यांना शिक्षणासमवेत व्यवहारिक ज्ञान देण्याचे काम करीत आहे.कोणतीही वस्तू ही आपल्या बोलण्याच्या गुणवत्तेनुसार विकली जाते. मात्र, त्यासाठी आपले कौशल्य अतिशय महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलवरील राखी या परिसरातील महिलांकडून खरेदी करण्यात आली.


यावेळी सहशिक्षक सरस्वती कवाद, वैजनाथ जाधव, स्वयंसेविका निकिता गडगे, साक्षी जांभुळकर, मनीषा गडगे उपस्थित होत्या. यावेळी शाळेच्या व्यवस्थापन समिती सदस्य,माजी विद्यार्थी, पालक ग्रामस्थ व मुलांना ग्रुप ग्रामपंचायत वडगाव मा. सरपंच गौरीताई गडगे यांच्याकडून खाऊचे वाटप करून उपक्रमाची सांगता करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा करुणा ठोंबरे, उपाध्यक्षा राजश्री जांभुळकर यांच्या उपस्थितीत राखी प्रदर्शन या सहशालेय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिव्यांग विद्यार्थिनींनी बांधल्या पोलीसदादांना राख्या

| खोपोली | वार्ताहर |
सदैव ऑन ड्युटी 24 तास असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. या पार्श्वभूमीवर रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून खोपोली पोलीस ठाण्यात शालोम एज्युकेशन सेंटर संचालित सोफीया दिव्यांग शाळेच्या विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.


शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहावयाला मिळाला. याप्रसंगी खोपोली पोलीस ठाण्याचे पो.नि. शितलकुमार राऊत, स.पो.नि. प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक अभिजीत व्हराबळे, अलोक खिसमतराव, सुधाकर लहाणे, कर्मराज गावडे, सहाय्यक फौजदार सागर शेवते, सचिन घरत, प्रसाद पाटील, किरण शिर्के, तडवी, वसंत जाधव, भारती नाईक, स्नेहल घरत, प्रांजली पाटील, तसेच शाळेच्या शिक्षिका साक्षी पवार, मंजू बोडके, सहाय्यक जयकुमार म्हात्रे, कर्मचारी रुचिता सावंत, दुर्गा दबडे उपस्थित होत्या.

मुरुडमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा

| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरातील घरोघरी आज रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. राखी खरेदीसाठी आज सकाळपासून बाजारपेठेत बहिणींनी गर्दी केली होती.


बहीण-भावाच्या सुंदर नात्याचा आणि आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वांच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण आज उत्सवात साजरा करण्यात आला. ओंकार याच्या कपाळावर अक्षतांसहित टिळा लावून राखी बांधून बहीण सायलीने त्याची औक्षण केले.

नदीने बांधली विद्यार्थ्यांना राखी

| माणगाव | प्रतिनिधी |
‌‘चला जाणूया नदीला’ या शासनाच्या उपक्रमाला प्रोत्साहन देण्याकरिता व तरुण पिढीमध्ये याविषयी जनजागृती करण्याकरिता हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया यांच्या संकल्पनेतून हिरवळ महाविद्यालयात एक नवीन उपक्रम राबविण्यात आला. हा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजेच नदीने बांधली विद्यार्थ्यांना राखी. ज्या प्रमाणे एक बहीण आपल्या भावाला राखी बांधून आपल्या संरक्षणाचे वचन घेते, त्याचप्रमाणे आज नदीच्यावतीने रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या अध्यक्षा सपना शेठ यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना राखी बांधून एक प्रकारे नदी संवर्धनाचे, तिच्या संरक्षणाचे वचन सर्वांकडून घेतले. या उपक्रमासाठी प्रदीप शेठ (रोटरी फाउंडेशन), हिरवळ प्रतिष्ठानचे सदस्य गणेश खातु, हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे सेक्रेटरी संतोष बुटाला, हिरवळ महाविद्यालयाचे प्रा. सुदेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.


गणेश खातू यांनी नदी संवर्धन व पर्यावरण संवर्धन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या अध्यक्षा सपना शेठ यांनी पर्यावरण संशोधन संबंधित असलेल्या रोट्रॅक्ट क्लबविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यामध्ये नोंदणी करण्याकरिता आवाहन केले. हिरवळ महाविद्यालयाचे प्रा. सुदेश कदम यांनी या कार्यक्रमामार्फत नदी संवर्धन व पर्यावरण संवर्धन हे आपले एक सुजाण नागरिक म्हणून असलेले कर्तव्य आहे आणि ते आपण जबाबदारीने पार पाडले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

राखी बांधून पोलिसांप्रति कृतज्ञता

| माणगाव | प्रतिनिधी |
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून एक राखी देशासाठी या उपक्रमांतर्गत रा.जि.प शाळा विकास कॉलनी येथे रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याचे शिवराज बांडे व बाळू बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. पोलिस बांधव 24 तास समाजाचे रक्षण करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी बांधण्यात आली.


आपल्या शहरातील सर्व माता भगिनींचे रक्षण आजपर्यंत करीत आहात तसेच रक्षण करावे, अशी ओवाळणी यावेळी मागितल्याचे शाळेच्या मुख्यध्यापिका गीतांजली शेळके यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलीस निरीक्षक वासुदेव देसले तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बांधल्या. रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करण्याऱ्या वाहतूक पोलिसांना देखील राखी बांधून ओवाळण्यात आले. यावेळी शिक्षिका खेमनार खेमणार, गायकवाड आदी उस्थित होत्य. चिमुकल्या विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी भारावले होते.

Exit mobile version