काही स्टॉलधारक नाराज, तर काही राजी
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ नेहमीच गजबजलेले असते. येथील विविध स्टॉल्समधून मिळणाऱ्या सुविधा पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, आता हेच स्टॉल स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त कारवाईने किनाऱ्यापासून हटवण्यात आले. या कारवाईमुळे काही दुकानदारांच्यात नाराजी, तर काही दुकानदार राजी असल्याचे दिसून येत आहे.
दिवेआगर हा सुरक्षित समुद्रकिनारा आहे. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी पाहायला मिळते. येथील साहसी खेळ, बोटिंग आणि त्याच बरोबर खाऊ, कपड्यांचे असे विविध स्टॉल्सवर मिळणाऱ्या सुविधा पर्यटनवाढीचे कारण बनले आहे. मात्र, हे स्टॉल सुरक्षेच्या दृष्टीने मेरीटाईम बोर्ड विभागाच्या कारवाईत हटवण्यात आले असून, पर्यायी लगतच्या एकाच मार्गावर सर्व स्टॉल लावण्यात आले आहेत.
येथील चार किलोमीटर अंतरात लांबलचक समुद्र चौपाटी असल्याने या विस्तीर्ण समुद्राची ओढ सगळ्यांनाच असते. याच किनाऱ्यालगत डांबरीकरणाने चार किलोमीटर अंतरात रस्ता बनला आहे. त्यामुळे येथील रुपनारायण किनारा, एक्झोटिका, हनुमान पाखाडी व सावित्री पाखाडी समुद्र किनारा अशी चार पॉइंट या नावाने ओळखली जातात. या ठिकाणच्या सर्व स्टॉल धारकांना ग्रामपंचायत हद्दीत दुकांनासाठी पर्यायी जागा देण्यात आली आहे. लगतच्या मार्गावर स्टॉल बसविण्यात आल्याने एका छताखाली सर्व दुकानदारांना व्यवसाय करण्याची संधी मिळेल. असे या कारवाईत स्पष्ट होत आहे.
समुद्रकिनारी भरती-ओहोटीपासून धोका निर्माण होऊ नये यासाठी येथील स्टॉलधारकांना किनाऱ्यापासून बाहेर काढण्यात आले.
राहुल धायगोडे, मेरीटाईम बोर्ड, दिवेआगर
खरं कारण काय रे भाऊ? दिवेआगर पर्यटनस्थळी व्यवसाय करणारे काही स्टॉलधारक समुद्रकिनारी होते, तर काही व्यावसायिक किनाऱ्यापासून बाहेर होते. त्यामुळे व्यवसाय कमी-जास्त होण्याची तफावत दुकानदारांमध्ये निर्माण झाली होती. सर्व व्यावसायिकांना सारखी संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला.