तळा तालुक्यातील नागरिकांची मागणी
| तळा | वार्ताहर |
ग्राहकांच्या वीजसमस्या दूर व्हाव्यात यासाठी विद्युत मंडळाचे दोन विभाग करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तळा तालुक्यातील निर्मिती 26 जून 1999 ला झाली. मात्र, तळा तालुका हा डोंगरी व दुर्गम असल्याने 67 महसुली गावे आहेत. ही गावे दूरदूरवरती डोंगराळ भागात गावे आहेत. महागाव, तळेगाव, मांदाड, तळा असे मोठे विभाग आहेत. तालुक्यात विद्युत मंडळाचे 13 हजार ग्राहक आहेत. तरी विद्युत मंडळांनी या ग्राहकांचा विचार करता दोन विभाग करून एक तळा शहर विद्युत मंडळ विभाग शाखा व दुसरा मांदाड विद्युत मंडळ शाखा विभाग असे दोन विभाग करावेत. त्यामध्ये 6500 असे दोन विभागात ग्राहक विभागावेत, अशी अपेक्षा नागरिकांतून होताना दिसत आहे.
सध्या तालुक्यासाठी तळा शहरात एकच शाखा असून, मांदाड विभागात नवीन सेक्शन शाखा होण्याची मागणी होत आहे. तळा सेक्शन शाखेत एकूण 14 कर्मचारी लाईनमन, अभियंते, कंत्राटी कामगार असे कार्यरत आहेत. डोंगराळ भाग असल्याने गावागावांमधील अंतर अधिक आहे. या गावांमध्ये विद्युत मंडळाच्या कर्मचार्यांना पावसाळ्यात एखाद्या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला अथवा डीपीची समस्या झाल्यास तात्काळ पोहाचण्यास वेळ लागतो. अशा विविध समस्या ग्राहक व कर्मचारी यांना येत असतात. पूर्ण तालुक्यासाठी एकच (सेक्शन) शाखा असल्याने कर्मचार्यांकडे अधिकचा भार पडून मोठ्या विभागाला तोंड द्यावे लागते. तसेच ग्राहकांनाही एखादी समस्या आली तर तळा येथे यावे लागते. त्यामुळे आणखी एक (सेक्शन) शाखा वाढवावी आणि ती मांदाड विभागात शक्यतो व्हावी, अशी अपेक्षा जनतेतून केली जात आहे. त्याचबरोबर दोन (सेक्शन) शाखा विद्युत मंडळाच्या तळा तालुक्यात व्हाव्यात, असा प्रस्तावही 2014-15 मध्ये पाठविण्यात आल्याचे समजते, तरी विद्युत मंडळाने दोन सेक्शन तालुक्यात सुरू करावेत, अशा मागणीला जोर चढताना दिसत आहे.