अपूर्ण कामाचे काढले पूर्ण बिल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत गावागावात कामे केली जात आहेत. परंतु, या कामांमधील सावळागोंधळ दिवीपारंगीमधील सामाजिक कार्यकर्ते जयवंत ठाकूर यांनी उघडकीस आणला आहे. योजनेचे काम झाले नसताना लाखो रुपयांचे बिल काढून ते गिळंकृत करण्याचा प्रकार समोर आणला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचायत हद्दीतील दिवीपारंगी गावातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागामार्फत काम मंजूर करण्यात आले होते. तसेच, या योजनेचे काम एका एजन्सीला देण्यात आले होते. मात्र, नऊ महिन्यांपूर्वी 22 नोव्हेंबर 2023 रोजी काम पूर्ण झाल्याची नोंद जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागात करून झाद एंटरप्रायझेस कंपनीच्या नावाने 30 लाख रुपयांचे कामाचे पूर्ण बिल काढण्यात आले असल्याचे ठाकूर यांनी उघड केले आहे. सद्यःस्थितीत गावातील जलजीवनचे काम अपूर्णच आहे. जलजीवनचे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप जयंवत ठाकूर यांनी केला आहे. ही बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि ठेकेदाराला काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या या कारभाराबाबत जनतेमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाचा सावळागोंधळ उघड झाल्यामुळे जिल्ह्यात अशाच प्रकारची कामे न करता बिले काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपूर्ण काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्या कामातदेखील भ्रष्टाचार होत असल्याचे उघड झाले आहे. पाईपलाईन टाकण्यासाठीचे खड्डे वरच्या वरच खोदला जात असल्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अधिकार्यांनी बोलणे टाळले
याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधला असता, उपअभियंता यांच्याशी संपर्क करा असे सांगून त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.