| बटुमी | वृत्तसंस्था |
जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या 2025 च्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्रातील दिव्या देशमुखने धमाकेदार विजय मिळवला आणि विश्वचषक विजेतेपद पटकावले. दोन्ही खेळाडूंमधील सुरुवातीचे सामने अनिर्णित राहिले. शनिवार आणि रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने नवीन बुद्धिबळ स्टार दिव्या देशमुखला आघाडी मिळवू दिली नाही. त्यामुळे मूळ सामना 1-1 गुणांनी बरोबरीत राहिला.
सोमवारी (दि.28) खेळल्या गेलेल्या रॅपिड राउंडमध्ये जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिने पहिल्या गेममध्ये पांढऱ्या सोंगट्यांसह सुरुवात केली. आक्रमक खेळ करत तिने जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानी असलेल्या कोनेरू हम्पीशी आधी बरोबरी साधली. मग रॅपिड राउंडच्या दुसऱ्या गेममध्ये काळ्या सोंगट्यांसह खेळताना दिव्याने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले आणि कोनेरूला पराभवाची धूळ चारली.
बुद्धिबळ तज्ज्ञांच्या मते, दिव्याची तयारी उत्कृष्ट होती. स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने सामन्यापूर्वी सांगितले होते की, कोनेरू हम्पी खूप मजबूत आहे, परंतु सध्या मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या दिव्याच्या बाजूने माप झुकण्याची शक्यता अधिक आहे. त्यांचे म्हणणे खरे ठरले. मोठी गोष्ट म्हणजे दिव्या आणि हम्पी दोघींनीही चीनच्या खेळाडूंना हरवून अंतिम फेरी गाठली होती.
विजेत्यासाठी मोठी बक्षिस रक्कम
महिला विश्वचषक 2025च्या अंतिम सामन्यातील विजेत्या दिव्या देशमुखला सुमारे 42 लाख रुपये आणि उपविजेत्या कोनेरू हम्पीला सुमारे 35,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 30 लाख रुपये बक्षिसे मिळणार आहे. याशिवाय, या खेळाडूंनी अत्यंत प्रतिष्ठित कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे. अशा परिस्थितीत, त्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त प्रायोजक मिळण्याची अपेक्षा आहे.
चीनला मागे टाकून भारत बनला चॅम्पियन
या स्पर्धेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही भारतीय खेळाडूंनी चायनीज वॉल तोडून फायनलमध्ये प्रवेश केला होता. फिडे वर्ल्ड कपच्या नॉकआउट टूर्नामेंटच्या फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी 38 वर्षीय कोनेरू हम्पी आणि 19 वर्षीय दिव्या देशमुखने अनेक चीनी खेळाडूंना हरवले. महिला गटात टॉप 100 मध्ये चीन अव्वलस्थानी आहे. चीनचे 14 खेळाडूंच्या तुलनेत भारताचे 9 खेळाडू टॉप 100 मध्ये सामील आहेत. पण वर्ल्ड कपमध्ये कोनेरू आणि दिव्याने चीनच्या मजबूत खेळाडूंना मात देऊन भारताचे वर्चस्व सिद्ध केले.
मला हे समजून घेण्यासाठी वेळ लागेल. मला वाटते की, हे माझ्या नशिबात होते की मला अशा प्रकारे ग्रँडमास्टर पदवी मिळाली. या स्पर्धेपूर्वी माझ्याकडे एकही नॉर्म नव्हता. ही स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. अजून बरेच काही साध्य करायचे आहे. मला आशा आहे की, ही फक्त सुरुवात आहे.
दिव्या देशमुख,
ग्रँडमास्टर







