सर्वसामान्यांची दिवाळी गोड; जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट व शेकापचा पुढाकार

बाजारभावापेक्षा अल्प दरात फराळाच्या साहित्याची विक्री
पनवेल | वार्ताहर |
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटाचा जबरदस्त फटका तळागाळातील सर्व स्तरांसह मध्यमवर्गीयांनाही बसला. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडल्यामुळे यंदा दिवाळीत खरेदी करण्यासाठी अनेकांपुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. या अनुषंगाने गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी यंदाची दिवाळी गोड व फराळासहित साजरी व्हावी, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शेतकरी कामगार पक्ष व जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर नामांकित व उच्च प्रतीच्या दिवाळी फराळाच्या साहित्याची विक्री केली जात आहे.
सातत्याने गेल्या पाच वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असून, यंदाही पनवेल शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात शुक्रवार, दि. 29 ऑक्टोबरपासून या उपक्रमाचा शुभारंभ पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका प्रीती जॉर्ज, नंदू भोईर, गणेश म्हात्रे, हरीश मोकल, चेतन शहा, अविनाश मकास, रोहन गावंड, शिवराज साखरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

नागरिकांमधून समाधान
दिवाळीच्या फराळासाठी आवश्यक असलेले जिन्नस याठिकाणी बाजारभावापेक्षा कमी दरात विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. एक किलो साखर, अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा या तीन वस्तूंची बाजारपेठेत किंमत जवळपास 135 रुपये इतकी आहे. परंतु, या उपक्रमांतर्गत विक्रीसाठी ठेवलेल्या या तिन्ही जिन्नसांची किंमत अवघी 80 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, नागरिकांना यातून 55 रुपयांची सूट देण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

या उपक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, हा एकमेव हेतू आहे. पनवेल-उरण मधील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते

Exit mobile version