। पनवेल । प्रतिनिधी ।
जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आरोग्यसेवा आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गरजूंना विविध साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत या संस्थेने कोरोना काळातही अनेकांना मदतीचा हात दिला आहे. आरोग्य सेविकांकडून दिव्यांग बांधव रमाकांत कुंभार यांना एका व्हीलचेअरची आवश्यकता असल्याची माहिती मिळताच संस्थेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी तात्काळ ती उपलब्ध करून दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांच्या हस्ते ही व्हीलचेअर रमाकांत कुंभार यांना देण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक जे.एम. म्हात्रे यांच्या नावाने प्रीतम म्हात्रे यांनी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था उभी केली. आजपर्यंत अनेक गरजूंना या संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यात आली. कोरोना कालखंडामध्ये अनेक भुकेलेल्यांना अन्नाचा सुखाचा घास भरविण्याचे पुण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्यांनी हजारो टन फराळाचे साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोच केले. सामाजिक क्षेत्रासह, क्रीडा, सांस्कृतिक आणि आरोग्यसेवेत त्यांनी आपले योगदान दिले आहे. नुकतेच आरोग्यसेवा आपल्या दारी हा उपक्रम ते राबवित असताना दिव्यांग बांधव रमाकांत कुंभार यांना एका व्हीलचेअर उपलब्ध करून दिली. यावेळी रमाकांत कुंभार यांनी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांचे आभार मानले.