माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांचा सल्ला
। कर्जत । वार्ताहर ।
माहिती अधिकार कायद्याबाबत नेहमीच अनभिज्ञ असलेल्या कर्जत नगरपरिषदेच्या जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांनी माहिती अधिकार कायद्याची संपूर्ण माहिती करुन घेण्यासाठी शासकीय शिकवणी घेणे गरजेचे आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांनी सांगितले. माहिती अधिकार कायद्यान्वये नागरिकांनी मागितलेली माहिती कर्जत नगरपरिषदेकडून दिली जात नाही, अशा अनेक तक्रारी असून, जर माहिती दिलीच, तर ती चुकीची, दिशाभूल करणारी व खोटी दिली जाते. त्यामुळे बर्याचदा नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे गंगावणे यांनी म्हटले आहे. पारदर्शक कारभाराचा आदर्श ठेवून नगरपरिषद कामकाज करत असेल, तर अशा प्रकारे नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास का दिला जात आहे, हे न उलगडणारे आहे. त्यामुळे खरचं नगरपरिषद प्रशासन पारदर्शक कारभार करते का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यातच कर्जत नगरपरिषदेचे स्वतःचे इन्फॉर्मेशन पोर्टल मागील कित्येक वर्षांपासून बंद आहे आणि अपिलीय अधिकारी यांनी अपिलाची सुनावणी मात्र ऑनलाईन ठेवली आहे. अपिलीय अधिकारी महोदयांनी कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता पळवाट काढण्यासाठी सुनावणी ठेवली आहे, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. अपिलकर्त्याकडे ऑनलाईन सुनावणीसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आहे की नाही, ते पाहणेदेखील गरजेचे होते. तसेच सद्य परिस्थितीत राज्यात सर्वच ठिकाणी ऑफलाईन सुनावणी होत असताना कर्जत नगरपरिषदेच्या अपिलीय अधिकार्यांनी मात्र चांगलीच पळवाट शोधून काढली आहे. तरी, कर्जत नगरपरिषदेच्या जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांनी माहिती अधिकार कायदा पायदळी तुडवू नये व नागरिकांना योग्य ती माहिती पुरवून आपल्या पारदर्शक कारभाराचा नमुना दाखवावा, असे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांचे म्हणणे आहे.