श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर हाऊसफुल
| दिघी | वार्ताहर |
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस श्रीवर्धन तालुक्यातील रिसॉर्ट फुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दिवाळीपूर्वी पर्यटन फुलल्याने व्यावसायिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तालुक्यातील सर्वच ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरलेली दिसत आहेत.
सोमवारपासून शालेय परीक्षा सुरू होत असल्याने अनेक कुटुंब बच्चे कंपनीला घेऊन या विकेंडला सुट्ट्या घालवायला दिवेआगरकडे वळले. या सुट्टीत पर्यटनाची हौस भागविण्याची जणू काय संधीच मिळाली असून अनेकांनी पर्यटनासाठी कोकणाला पहिली पसंती दिलेली आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र गर्दी पाहायला मिळाली. दिवाळीपूर्वी पर्यटनाची चाहूल लागल्याने व्यावसायिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. दिवेआगर येथील लांबलचक समुद्र चौपाटी असल्याने येथे समुद्राची ओढ सगळ्यांनाच असते. उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेले निळेशार पाणी, किनाऱ्यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग यामुळे कोकणात अगदी फॉरेन टूरचा फील येत असून यासर्व सुविधा पुरविण्यासाठी दिवेआगर येथील व्यवसायिक सज्ज असल्याचे दिसून आले.
दिवेआगर समुद्रकिनाऱ्या सोबत येथील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे कोकण कायमच हवाहवासा वाटतो. धार्मिक पर्यटन करणाऱ्यांसाठी श्रीवर्धन मधील सोमजाई मंदिर, पेशवे मंदिर, दक्षिण काशी हरिहरेश्वर तसेच दिवेआगर श्री सुवर्णगणेश मंदिर आणि मुरुड जंजिरा किल्ला असे अनेक पर्याय आहेत. समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करणाऱ्या पर्यटकांसाठी श्रीवर्धन, दिवेआगर, वेळास, आदगाव, कोंडविल असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सद्या थंडीने देखील जोर धरला असून, दिवेआगर परिसराचा अनुभव घेत आहेत. कारण येथील सर्वच गावांमधील मंदिरे, जुनी घरे, छोट्या वाड्या हे सारेच पाहण्यासारखे आहे. दिवाळी स्वागतासाठी पर्यटकांची रेलचेल आतापासूनच सुरू झाल्याने व्यापारी वर्गाला सुगीचे दिवस आल्याचे आनंद वातावरण तयार झाले आहे.