शिधापत्रिकाधारकांस मिळणार फराळाच्या जिन्नस
प्रीतम म्हात्रे यांच्या प्रयत्नाना यश
| पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त शासनाने नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येक शिधापत्रिकाधारकास दिवाळी फराळासाठी लागणारे आवश्यक जिन्नस सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दोन दिवसांवर दिवाळी आली असताना सुद्धा या वस्तू शिधाधारकांना उपलब्ध होत नसल्याने पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतच त्यांनी पुढील दोन दिवसात यासंदर्भात युद्ध पातळीवर निर्णय घेऊन शिधावाटप केंद्रामध्ये वरील वस्तू उपलब्ध कराव्यात आणि त्याचे नियोजन योग्य पद्धतीने करावे अशी मागणी त्यांनी पनवेल-उरण तहसीलदार यांना केली आहे.
या पॅकेजमध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, एक लिटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश असलेला शिधाजिन्नस संच उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. दिवाळीच्या निमित्ताने आवश्यक असलेले चार महत्त्वाचे जिन्नस अवघ्या 100 रुपयांत रेशनवर मिळणार होत्या. परंतु हे पॅकेज अद्यापही उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून म्हात्रे यांच्याकडे प्राप्त होताच त्यांनी तात्काळ याबाबत पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार दोन दिवसात पनवेलचे व उरणचे तहसीलदार यांनी यासंदर्भात युद्ध पातळीवर निर्णय घेऊन शिधावाटप केंद्रामध्ये शनिवार पर्यत वरील वस्तू उपलब्ध कराव्यात आणि त्याचे नियोजन योग्य पद्धतीने करावे असे आवाहन म्हात्रे यांनी केले आहे. त्यामुळे गोर गरीबांची दिवाळी गोड होणार आहे.
कोट:
महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना महाराष्ट्र शासनाकडून या चांगल्या उपक्रमाचे नियोजन व्यवस्थित करणे अपेक्षित आहे. पनवेलचे तहसीलदार यांनी सांगितले की आम्हाला काही वस्तू अजून येणे बाकी आहे. त्या वस्तू आल्या की येत्या शुक्रवार पर्यंत सर्व केंद्रांवर वस्तू उपलब्ध करून देऊ. तसेच उरणचे तहसीलदार यांनी शनिवारपर्यंत सर्व केंद्रांवर आवश्यक त्या वस्तू नागरिकांसाठी वस्तू उपलब्ध करून देऊ असे सांगण्यात आले. -प्रीतम जनार्दन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका
गरीबांची दिवाळी होणार गोड
