मराठी साहित्यातील ‘मिरासदारी’ संपली

ज्येष्ठ विनोदी साहित्यिक द.मा.मिरासदार कालवश
। पुणे । प्रतिनिधी ।
मराठी साहित्य विश्‍वातील ज्येष्ठ विनोदी लेखक,अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.द.मा.मिरासदार यांचे शनिवारी(2 ऑक्टोबर) वार्धक्याने निधन झाले.ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी वाङमयातील मिरासदारी संपुष्टात आली आहे.मिरासदार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह साहित्य विश्‍वातील मान्यवरांनी शोक प्रकट केला आहे.रविवारी त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मिरासदार हे मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार म्हणून प्रचंड लोकप्रिय होते.. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एमए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इ. स. 1952 साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. 1961 मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.

द. मा. मिरासदार ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळे. मिरासदारांच्या कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरही कलकत्ता, इंदूर, हैदराबादसारख्या शहरांतून कार्यक्रम झाले. त्याचप्रमाणे त्यांनी कॅनडा-अमेरिकेतल्या 23 गावांतून 25 कार्यक्रम करायचा विक्रमही केला होता. कथाकथनाखेरीज त्यांची विनोदी भाषणेही गाजत असत.

मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदा लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारानी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे इत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे 24 कथासंग्रह, 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. मएक डाव भुताचाफ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी वठवली होती.

मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ङ्गस्पर्शफ, ङ्गविरंगुळाफ, ङ्गकोणे एके काळीफ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तथापि त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती मिस्किल कथा लिहिण्याकडेच आहे.

एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ङ्गव्यंकूची शिकवणीफ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. पुणे शहरात त्यांच्या नावाचे द.मा. मिरासदार प्रतिष्ठान आहे.

कथाकथनाचे तीन हजार प्रयोग
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार ही त्रयी 1962 सालापासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथने करीत असत. त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची उत्तम करमणूक केली होती. कथाकथनाचे तीन हजारांहून अधिक कार्यक्रम केल्याने या त्रयीच्या कार्यक्रमात परिपक्वता जाणवत असे.

Exit mobile version