तुम्ही गुलाम होऊ नका- राज ठाकरे

। पंढरपूर । वृत्तसंस्था ।

गेली 60 वर्षे त्याच प्रश्‍नावर निवडणूक होती. तुम्ही सर्वजण निवडणून देता. मात्र त्यांना एकदा तरी विचारा, आमचे प्रश्‍न का सुटले नाहीत. निवडून आलेले तुमचे गुलाम आहेत. तुम्ही गुलाम होऊ नका. एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्या बघा कसे वठणीवर आणतो, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर तोफ डागली.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे व जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मंगळवेढा येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मी मंगळवेढा येथे येण्यापूर्वी माहिती घेतली तर म्हणे हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. गेली 60 वर्षे पाणी, वीज, शेती, रोजगार हे प्रश्‍न सोडवू, आम्हाला मत द्या, असे म्हणत चारही पक्षांनी आलटून पालटून सत्ता भोगायची आणि प्रश्‍न तसेच ठेवायचे. तुम्ही त्यांना जाब विचारा? का प्रश्‍न सुटला नाही, असे राज यांनी ठणकावून सांगितले.

तुमच्या गावात रोजगार आणून देणार. शेतकरी आत्महत्या करत आहेत. महिला सुरक्षित नाहीत. मुलींना पळवले जाते, अत्याचार होतात. संधी द्या. कसं वठणीवर आणतो, ते बघा, असे ते म्हणाले. एकीकडे लाडकी बहीण म्हणून पैसे द्यायचे आणि दुसरीकडे भाववाढ करून वसूल करायचे. लाडके भाऊ मेले काय? असा सवाल उपस्थित करत ठाकरे यांनी टीका केली. 2014 साली मनसेने विकास आराखडा मांडला होता. कोणत्याही पक्षाने असे धाडस दाखवले नाही. निवडणूक आली की भूलथापा द्यायच्या, पैसे वाटायचे आणि सत्तेत जायचे हेच चालू आहे. चार पक्षांनी आजार बरे झाले नाही, पाचवे औषध म्हणून मनसेला संधी देऊन बघा, असे म्हणत मनसेच्या सर्व उमेदवारांना तुमचे मत द्या, असे आवाहन राज यांनी केले.

Exit mobile version