। रायगड । वार्ताहर ।
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघांतील निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने, निवडणूक लढविणार्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निबंध घालणे आवश्यक होते.







