लहान मुलांना कावीळची लागण
। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
ग्रुप ग्रामपंचायत कलोते रायती येथे मोठे धरण असून या माध्यमातून येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला जात आहे. मात्र, या ठिकाणी पाळीव प्राणी पाळले जात असल्यामुळे त्यांचे मळ, मुत्र, विष्ठा या पाण्यांत मिसळले जात आहे. यामुळे हे पाणी दिवसेंदिवस दूषित होत चालले आहे. हेच पाणी या परिसरातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्यामुळे येथिल 20 ते 25 लहान मुलांना कावीळची लागण झालेली आहे.
पुर्वी या कलोते धरणाचे पाणी शुद्ध होते. मात्र,गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणी धनिकांनी येथिल शेतकरी वर्गांच्या जागा घेऊन शेतघरे बांधली असून उंट, गाय, विविध जातीचे कुत्रे, घोडा, ससे, मांजर पाळले आहेत. तसेच, याच ठिकाणी आजारी प्राण्यांवर उपचार केले जातात. तर, काही प्राण्यांचे मलमुत्र व विष्ठा हे या धरणाच्या संपर्कात येत असल्यामुळे दिवसेंदिवस पाणी दुषित होत चालले आहे. विषेश म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय याच गावात असून याकडे साफ दुर्लक्ष करत आहे.
या परिसरातील स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठबळ असल्यामुळे कुणालाही न जुमानता राजरोसपणे येथे पाळीव प्राण्यांचा व्यवसाय सुरु आहे. या संदर्भात येथिल ग्रामस्थ अक्रमक झाले असून शासकिय पातळीवर निवेदन देण्यात आले आहे. मात्र, या धरणावर धनिकांची वक्र दृष्टि असल्यामुळे पिण्याच्या पाण्याला ग्रहण लागले असल्यांचे समोर आले आहे.







