| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचे असते, तर सभागृहातील संख्याबळावर पडले असते. त्यामुळे उगाचच कुणीतरी सरकार पडणार, अशी भाषा करू नये, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवेसना खासदार संजय राऊत यांना सुनावले आहे. आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार असून विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असे देखील नार्वेकरांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने जी कालमर्याता दिली आहे. त्यानुसार वेळेत निर्णय द्यायचा माझा विचार आहे. पण कोणत्याही नैसर्गिक न्याय तत्त्वाला धक्का पोहचणार नाही, विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार आहे, असे नार्वेकर म्हणाले.
पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे, की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घ्यायचा नाही. निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. त्यामुळे उगाच पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लंघन झाले आहे, अशा प्रकारचे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी करू नयेत. कायद्याचे उल्लंघन झाले असेल, तर निश्चितच सक्षम विधानसभा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेईन. महाराष्ट्रातील जनतेला मी आश्वासीत करतो, की कुठल्या प्रकारचा चुकीचा निर्णय दिला जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने निश्चिंत राहावे, असेही त्यांनी सांगत आदित्य ठाकरेंना टोला लगावला.
स्थानिक स्वराज्य निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सरकारने या निवडणुका लवकर व्हाव्यात असे आपले म्हणणे दिले आहे. परंतु याचा निकाल न लागल्यामुळे या निवडणुका घेता येत नाहीत, असे नार्वेकर म्हणाले.