| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील महात्मा गांधी रस्त्याने पुढे ऑलंपिया रेसकोर्स भागात जाणार्या गुलिस्तान बंगला ते कच बंगला या भागातील रस्त्याचे काम राज्य सरकारच्या नगरोत्थान सुवर्ण जयंती कार्यक्रमातून मंजूर झाले आहे. त्या रस्त्याच्या कामासाठी खडी दगड आणून टाकण्यात आले आहेत. मात्र, त्या रस्त्याच्या कामास अश्वपाल संघटनेने विरोध केला आहे. दरम्यान, आपले आयुष्य लाल मातीच्या रस्त्याने चालून जाणार काय, हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी त्या भागातील नागरिकांनी माथेरान नागरपोरिषद कार्यालयात येऊन रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी केली.

माथेरान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून पुढे वन ट्री हिल परिसरातील नागरिकसांठी आणि येथील गव्हाणकर शाळकडे जाणारा कच बंगल्यापासून गुलिस्तान बंगला हा 300 मीटर लांबीचा रस्त्याचे काम राज्य सरकारच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान प्रकल्पमधून धूळविरहित रस्त्यात रूपांतर करण्याचे काम मंजूर आहे. त्या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी खडीदेखील टाकण्यात आली होती, मात्र त्या रस्त्यावरून जाताना घोड्यांचे पाय घसरतील आणि त्यामुळे रस्त्याचे काम करू नये, अशी मागणी अश्वपाल संघटना यांनी केली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम पालिकेने रद्द केले आहे काय, अशी भीती स्थानिक नागरिक यांना भेडसावत असल्याने स्थानिक नागरिकांनी पालिकेत जाऊन याबाबत निवेदन दिले. त्यावेळी तेथील प्राचार्य गव्हाणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांच्यासह अनिता सुर्वे, नम्रता गोरे, किशोरी ढोले, नीता खडे, सुप्रिया कदम, कमल सकपाळ, प्रमिला चव्हाण आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या.
आमच्या शाळेतील विद्यार्थी सध्या दगडाच्या रस्त्यातून पायवाट काढत जात आहेत. त्यात त्या भागात रुग्णवाहिका न्यायाची झाली तरी नेता येणार नाही आणि त्यामुळे शासनाने मंजूर केलेला रस्ता झाला पाहिजे.
कल्पना पाटील, मुख्याध्यापिका, प्राचार्य गव्हाणकर शाळा