। मुंबई । प्रतिनिधी ।
संतोष देशमुख यांच्या खूनाच्या कारस्थानात ज्यांचा हात आहे, त्या व्यक्तीचा मंत्रीमंडळात समावेश आहे. या खर्या आरोपींना पकडायची हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का अशा शब्दात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
महाराष्ट्रातील कायदे सुव्यवस्थेची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलत आहेत. संतोष देशमुखची हत्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर झाली आहे. व्हिडीओ आहेत त्याचे तरीही तुम्ही ते लपवायचा प्रयत्न करत आहात. महराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे हे फडणवीसांनी समजून घ्यावे. परभणी बीडमध्ये ज्या घटना घडल्या आहेत, त्या राज्याच्या प्रतिष्ठेला कलंक, काळीमा फासणार्या आहेत आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित संशयित आरोपी आपल्या मंत्रीमंडळात बसलेले आहेत. आपण त्यांना घेतलेले आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी होती. सरकारची जबाबदारी होती त्यांचे प्राण वाचवायची. ज्यांनी या हत्या घडवल्या त्यांना पाठिशी घालत आहात. याच्यावर बोला. खरंतर मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी जस्टिस सुब्रमण्यम यांची कालच नेमणूक झाली. परंतु, सगळे गुलाम आहेत ते मोदींचे. हा महाराष्ट्र मानवता व माणूसकीसाठी ओळखला जात होता. गेल्या पाच वर्षात या महाराष्ट्रात रोज माणूसकीचा खून होत आहे. देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलत आहेत. आम्हाला लाज वाटते याची, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांनवर निशाणा साधला आहे.