68 वर्षांपर्यंत तरुण म्हणायचे का?; भुजबळांचा अजित पवारांना टोला

। मुंबई । प्रतिनिधी ।

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते प्रचंड नाराज असताना आपल्याला डावलण्यामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल असल्याचे ओबीसी नेत्यांचे स्पष्ट मत असल्याचे खुद्द भुजबळ यांनीच सांगितले आहे. तसेच, तरुणांना संधी देण्यासाठी वरिष्ठांना मंत्रिपद दिले नसल्याचे अजित पवार यांनी एका मेळाव्यात सांगितले होते. मात्र, तरुण म्हणजे किती वर्षांपर्यंत तरुण म्हणायचे? मग 67 ते 68 वर्षांपर्यंत तरुण म्हणायचे का?, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.

महायुती सरकारने नुकतीच मंत्रिपदाची यादी घोषित करताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या नेत्यांना डावलून धक्का दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्रिपदापासून डावलल्यानंतर छगन भुजबळ यांनी राज्यभरातील ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन संवाद साधला आहे. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. मला लोकसभा निवडणुकीचे तिकीट वेळेत दिले नाही म्हणून तेव्हा मी माघार घेतली. मात्र, आता पुन्हा लोकसभेवर जाण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे विधानसभेवेळीच मला आधी सांगितले असते की निवडणूक लढवू नका तर निवडणूक लढवलीही नसती, असा संतापही भुजबळ यांनी व्यक्त केला. तसेच, पुढील भूमिका जाहीर करण्यास वेळ लागेल असेही ते म्हणाले.

Exit mobile version