। सोलापूर । प्रतिनिधी ।
सोलापूरमध्ये एका डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी एका एमबीबीएस झालेल्या प्रशिक्षणार्थी तरुण डॉक्टरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. चाकूच्या सहाय्याने स्वत:चा गळा कापून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आदित्य नमबियार असे मृत तरुण डॉक्टरचे नाव असून तो एका सरकारी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होता. आदित्यने नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. आदित्य सोलापुरात भाड्याच्या रूममध्ये राहत होता तिथेच बाथरूममध्ये आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. तसेच, त्याच्या मृतदेहाशेजारी एक चाकू आणि कात्री सापडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, तरुण शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.