| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील अटल सेतू पुलावरून सोमवारी (दि.7) रात्री एका डॉक्टरने उडी मारल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने डॉक्टरला पुलावरून खाडीत उडी मारताना बघितले आणि पोलिसांना माहिती दिली. पुलावर कार आणि मोबाईल मिळाला आहे. सोमवारी ही घटना घडली असून, मंगळवारी दुपारपर्यंत डॉक्टरांचा शोध लागला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कार थांबवून एका व्यक्तीने खाडीत उडी मारल्याची माहिती मिळाली. पोलिसांना पुलावर होंडा अमेझ कार आणि एक आयफोन मिळाला. मोबाईलमुळे त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना मदत झाली. ओंकार भागवत कवितके (32) असे या उडी टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, पेशाने डॉक्टर असून जे.जे हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. ते कळंबोली येथे राहतात. डॉ. ओंकार कवितके यांनी उडी मारल्याची माहिती मिळताच ध्रुवतारा बोट, शोध पथकाला पाचारण करण्यात आले. खाडीमध्ये शोध घेतला जात आहे. या घटनेबद्दल काही कळल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. ओंकार कवितके यांचा शोध सुरू असून, त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला याचाही तपास सुरु आहे.







