महाडमधील डॉक्टराची फसवणूक

| महाड | वार्ताहर |

तुमच्या मुलीला कर्जतच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून कर्जतच्या एका दाम्पत्याने महाडमधील डॉक्टरची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत महाड शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड शहरातील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. आदेशकुमार पाथरे यांच्या मुलीला कर्जत मधील डॉ. एन. वाय. तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून नितीन जयवंत पवार (34) व निकिता नितीन पवार (30), दोघेही रा. आवळस, ता. कर्जत या दांपत्याने डॉ. पाथरे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून 6 एप्रिल ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत जुना पोस्ट महाड येथील त्यांच्या क्लिनिक येथून ऑनलाईन तसेच कॅश स्वरूपात 18 लाख 80 हजार रुपये घेतले होते. त्यातील चार लाख रुपये डॉ. पाथरे यांना त्याने परत केले. परंतु, उर्वरित रक्कम देण्यास मात्र या दांपत्याने टाळाटाळ केली. तसेच पाथरे यांच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश न देता त्यांची फसवणूक तर केलीच शिवाय त्यांच्या पत्नीला मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करत धमकीही दिली. या प्रकरणी आदेशकुमार पाथरे यांनी दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली असून महाड शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version