| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल येथील डॉक्टरांची एक प्रगतशील संघटना ‘पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’ यांच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष डॉ वैभव मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ हे घोषवाक्य घेऊन आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टीस्टर असोसिएशनचे हे चौथे वर्ष असून, यामधून डॉक्टर्सना मोठे मानसिक समाधान मिळत असल्याचे पहावयास मिळाले.
पनवेलमधील डॉक्टरांना स्वतःच्या व्यवसायाचा ताण कमी करण्यासाठी पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने या वारीची सुरुवात पनवेलमधील डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. प्रथमतः प्रतिबालाजी नारायणपूर येथे नारायण महाराजांचे दर्शन आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रामा पाटील यांच्यावतीने प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसादाचा लाभ घेतला. जेजुरी येथे खंडोबारायाचे दर्शन, त्यानंतर मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेऊन ही सर्व डॉक्टर मंडळी अकलूज येथे डॉ. विवेक देवकाते यांच्या घरी मुक्कामाला थांबली होती. आणि 25 जुलै रोजी सकाळी पंढरपूर येथे रायगड वारकरी भवन या ठिकाणी गणेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भवांमध्ये वारकऱ्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मोफत तपासणी आणि मोफत औषधोपचार अशी सेवा करण्यात आली.
सलग चौथ्या वर्षी करण्यात आलेल्या या वारीचे यशस्वी आयोजन पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल, उपाध्यक्ष डॉ वैष्णवी नाईक, सहखजिनदार डॉ. सुदर्शन मेटकर, डॉ. वैभव पाटील, डॉ. स्वप्नील लोखंडे, डॉ. आशिष गांधी डॉ. नरेश पाटील, डॉ. राजेश गांधी, डॉ. रसिका पाटील, डॉ. स्वप्नील बाविस्कर, डॉ. अमित दवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन ही वारी यशस्वी केली.







