रवींद्र चव्हाणांच्या पत्रानंतरही कार्यकर्ते प्रसाद लाडांच्या भेटीला
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमधील हात रिक्षा चालकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असताना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या हालचालींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्याची मागणी करत हात रिक्षा चालक आंदोलन करत असताना, प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतरही भाजप कार्यकर्ते थेट आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीला गेल्याने पक्षांतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माथेरानमध्ये “माणसाने माणसाला ओढण्याची” अमानवी प्रथा बंद करून 94 हात रिक्षा चालकांचे पुनर्वसन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2025 मध्ये दिले होते. मात्र, अद्याप राज्य सरकारकडून ठोस अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे हात रिक्षा चालकांकडून पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्याची मागणी करत विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी हात रिक्षा चालकांसह भाजप कार्यकर्त्यांनी राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीत चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 94 हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच लवकरच बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
मात्र, या घडामोडीनंतर अवघ्या दोनच दिवसांत माथेरानमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांची भेट घेतली. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण सकपाळ, नगरपालिकेचे उपाध्यक्ष संतोष शेलार, श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, सचिव सुनील शिंदे तसेच शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर उपस्थित होते.
या बैठकीत मनोज खेडकर यांनी ई-रिक्षा संदर्भात प्रत्यक्ष ग्राऊंड रिपोर्ट तपासण्याची मागणी शासनाकडे करावी, अशी विनंती केली. तर संतोष शेलार यांनी माथेरान नगरपालिकेने सर्व 94 हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा देण्याचा ठराव केल्याची माहिती दिली. प्रसाद लाड यांनीही विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या सर्व घडामोडींमुळे माथेरानमधील भाजपमध्ये नेमका समन्वय आहे की संभ्रम, असा सवाल उपस्थित होत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असताना, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी पुन्हा आमदार प्रसाद लाड यांची भेट घेणे चर्चेचा विषय ठरले आहे. सामान्यतः प्रदेशाध्यक्षांच्या पत्रानंतर तातडीने शासनस्तरावर हालचाली अपेक्षित असतात. मात्र, तरीही स्थानिक कार्यकर्ते वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करत असल्याने, त्यांना स्वतःच्या पक्षाच्या प्रदेश नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे माथेरान भाजपमध्ये निर्णय प्रक्रियेबाबत संभ्रम असून, कार्यकर्त्यांचा कल नेमका कुणाकडे आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.







