खा. वर्षा गायकवाड यांचा सवाल
| मुंबई | प्रतिनिधी |
माजी मंत्री व काँग्रेस आ.अस्लम शेख यांना भाजपाचे अमित साटम नाहक बदनाम करत आहेत. हिंदू-मुस्लीम वाद उपस्थित करून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा हा डाव आहे. पण, मुंबईकर मात्र भाजपाचा कुटील डाव ओळखून आहेत. काँग्रेस आ. अस्लम शेख हे मालवणीतील गरिबांचा आवाज आहेत. अमित साटम यांनी मंगलप्रभात लोढांसाठी अस्लम शेख यांना पोकळ धमक्या देण्याचे थांबवावे आणि टॉवर बांधताना मंगलप्रभात लोढा यांनी किती मंदिरे उद्ध्वस्त केली, याचे उत्तर द्यावे, असे खडसावून, मुंबई ही काही फक्त अदानी, लोढा व कंभोजची नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या संदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ज्या मालवणी पॅटर्नच्या नावाने आपण कंठशोष करत आहात, तो मालवणी पॅटर्न काय आहे, हे आधी समजून घ्या. ज्या लोढांसाठी आपण आमदार अस्लम शेख यांना पोकळ धमक्या देत आहात, ते अस्लम शेख मालवणी पॅटर्नचे उद्गाते आहेत. हिंदू- मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, बौद्ध अशा सर्व जाती धर्मांचे नागरिक जेथे गुण्यागोविंदाने नांदतात तो मालवणी पॅटर्न आहे. त्याउलट एका विशिष्ट समाजाला सोडून मुंबईतील मूळ भूमीपुत्रांनासुद्धा लोढा टॉवर्समध्ये घरे नाकारली जातात. मंगलप्रभात लोढा मालवणीतील गोरगरीबांच्या डोक्यावरचे छत्र हिरावून घेत आहेत. लोढा यांनी अंबोजवाडीत भर पावसात गोरगरीबांचे संसार उघड्यावर आणले होते. भाटी गावची हिंदू स्मशानभूमी मंगलप्रभात लोढा यांनीच तोडली. राठोडीतील हिंदूंना नोटीस न बजावता उघड्यावर आणणारे हेच मंगलप्रभात लोढा आहेत. आज हेच लोढा मालवणीतील सामाजिक ऐक्य संपवण्याचे काम करत आहेत. याविरोधात मालवणी पॅटर्न धर्मनिरपेक्षतेची मशाल तेवत ठेवत आहे आणि भाजपा व अमित साटम बांगलादेशी, रोहिंग्यांचा मुद्दा काढुन मालवणीतील हिंदूंना बेघर करत आहेत असा गंभीर आरोप खा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेत प्रशासकाच्या मदतीने भाजपा महायुतीचेच सरकार आहे, राज्यात त्यांचेच सरकार असून मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशांची लुट केली जात आहे. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या मुलभूत प्रश्नांवर निवडणुका लढल्या पाहिजेत पण मुंबईकरांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अमित साटमसारखे भाजपाचे लोक हिंदू मुस्लीम वाद निर्माण करत आहेत. पण त्यांचा हा कुटील डाव मुंबईकर हाणून पाडतील, असे शेवटी खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.







