खारघर मध्ये रंगला श्‍वानांचा फॅशन शो

| पनवेल | वार्ताहर |

कुठे भू-भू तर कुठे नाजूक आवाजात ओरडणे, छान छान ड्रेस परिधान केलेले सार्‍यांच्याच नजरा त्यांच्या देखण्या आकर्षक सजावटीकडे वळलेल्या. निमित्त होते खारघरमध्ये रंगलेल्या श्‍वानांच्या फॅशन शोचे. विविध ठिकाणी फॅशन शो आपण ऐकत असतो. या फॅशन शोमध्ये मानवनिर्मित विविध कपडे, त्यांचे प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती आपण पाहत असतो. मात्र खारघर शहरातील सेंट्रल पार्क मध्ये चक्क श्‍वानांचा आगळा वेगळा फॅशन शो चर्चेचा विषय ठरला. शहरातील खारघर डॉग पार्क ऑर्गनायझेशनच्या पुढाकाराने हा शो पार पडला.

शहरातील सेंट्रल पार्क हा तब्बल 100 एकरात पसरलेला आहे. विविध प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हीटी याठिकाणी दररोज होत असतात. याठिकाणाला दररोज शेकडो नागरिक भेट देतात. यापैकीच काही पाळीव प्राणी प्रेमी नागरिक देखील आहेत. या पार्कच्या एका भागाला डॉग पार्क नाव देऊन या नागरिकांनी ख्रिसमस निमित्ताने हा फॅशन शो भरवला होता. यावेळी वेगवेगळ्या प्रजातीच्या कुत्र्यांना सुंदर वेशभूषा परिधान करून त्यांचे फॅशन आयोजित करण्यात आले. या दरम्यान या पाळीव कुत्र्यांना डेनिम, फ्रॉक, सांताक्लॉज, रॉक स्टारची वेशभूषा परिधान करून त्यांचे फॅशन शो याठिकाणी पार पडले.

तब्बल 72 पाळीव कुत्रांचा या शो मध्ये सहभाग होता. खारघर नवी मुंबई परिसरात प्रथमच अशाप्रकारचा फॅशन शो पार पडला. या आगळा वेगळा फॅशन शो पाहण्यासाठी सेंट्रल पार्कमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या शोमध्ये सहभागी झालेल्या पाळीव कुत्र्यांच्या मालकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती आयोजक नुपुरा चव्हाण यांनी दिली.

जे लोक कुत्रा पाळतात ते तो आपल्या घरचा सदस्य असल्याप्रमाणेच त्याची काळजी घेतात. श्‍वान सुद्धा आपल्या मालकांवर जीवापेक्षाही जास्त प्रेम करतात. अनेक लोक तर आपल्या बाळाप्रमाणे आपल्या पाळीव श्‍वानांवर प्रेम करतात. याची प्रचिती या कार्यक्रमात आली. या श्‍वानांच्या सजावटीकडे लहान मुलांप्रमाणे काळजी या श्‍वानांच्या मालकांनी घेतल्याचे दिसून आले.

नुपूरा चव्हाण
आयोजक
Exit mobile version