पोलादपुरात श्‍वान निर्बिजीकरणाची मोहीम निष्फळ

पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर नगरपंचायतीने तीन वर्षांपूर्वी निर्बिजीकरणाची मोहीम सुरू करून नागरिकांना श्‍वानदंशापासून दिलासा देण्याचा उपक्रम सुरू केला. मात्र, त्यानंतरही श्‍वानदंशाच्या घटना घडल्या असून कुत्री व्यायल्याचे ठिकठिकाणी दिसून आल्याने ही कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम निष्फळ ठरून या मोहिमेमध्ये भ्रष्टाचार घडला आहे का, याबाबत प्रश्‍चचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलादपूर शहरातील अंदाजे 200 ते 250 मोकाट कुत्री असल्याचा प्राथमिक अंदाज आहेत. एका माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेल्या माहितीनुसार पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये 2019 मध्ये 83 जणांना श्‍वान दंश झाला तर 2020 मध्ये 94 जणांना श्‍वानदंश झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याखेरिज, पोलादपूर शहरातील आनंदनगर, भैरवनाथनगर तसेच अन्य भागामध्ये अनेक मादी कुत्र्यांनी पिल्ले जन्माला घातल्याची दृष्य रस्त्यावर पाहायला मिळाल्याने श्‍वानदंशापासून सुटकेसाठीची कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम निष्फळ ठरली आहे अथवा कसे, असा सवाल निर्माण झाला असून याप्रकरणी कुत्री व्यायली अथवा चावली तर भ्रष्टाचार होतो अथवा कसे, याबाबत नगरपंचायत पोलादपूरच्या प्रशासनाने उत्तर देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Exit mobile version